पालघरमधून काँग्रेसची उमेदवारी ‘यांना` निश्चित ?

पालघरमधून काँग्रेसची उमेदवारी ‘यांना` निश्चित ?

राज्यात लोकसभेच्या दोन पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपनं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना तिकीट देण्याचं ठरवलंय. त्यामुळे दिवंगत चिंतामण वनगा कुटुंबिय नाराज झाले आहे. पक्षाने आम्हाला वा-यावर सोडले असा आरोप करत त्यांनी थेट मातोश्री गाठली आणि हातात शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे काँग्रेसही उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. काँग्रेसनं माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचं नाव जवळपास निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस उमेदवार देणार की गेल्यावेळेप्रमाणे बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार अशी चर्चा आहे. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीत बहुजन विकास आघाडीची भाजपशी जवळीक आहे. त्यामुळे काँग्रेसने स्वसंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. काँग्रेसनं आणि भाजपनं उमेदवार दिल्यास बहुजन विकास आघाडी नेमकं काय करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. हितेंद्र ठाकूर आपला उमेदवार देणार की भाजपला मतदान करणार यावरच निवडणुकीची गणितं अवलंबून आहेत.

दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत अंतर्गत युती करणारी शिवेसना या निवडणुकीत काय भूमिका घेते याकडंही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. शिवेनेचा उमेदावर उभा राहतो की उमेदवार न उभा करता अंतर्गत भाजपला मदत करणार की काँग्रेसला मदत करणार यावरही निवडणुकीची गणितं अवलंबून आहेत. या मतदारसंघात डाव्या पक्षांचीही काही प्रमाणात ताकद आहे. सध्याची राजकीय स्थिती विचारात घेता. ते उमेदवार देणार की काँग्रेसला मदत करणार हेही पहावं लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डावे पक्ष काँग्रेसला मदत करण्याची श्कयता आहे.

COMMENTS