भंडारा गोंदियात राष्ट्रवादीकडून दोन तर भाजपकडून तीन नावांची चर्चा !

भंडारा गोंदियात राष्ट्रवादीकडून दोन तर भाजपकडून तीन नावांची चर्चा !

मुंबई – आघाडीच्या जागावाटपात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्याने आता उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. फ्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर असल्यामुळे आणि त्याची बरीच मुदत शिल्लक असल्यामुळे प्रफुल्ल पटेल ही निवडणूक लढवणार नाहीत हे जवळपास निश्चित झालं आहे.  प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल पटेल हे मतदारसंघाच्या बाहेर असताना मतदारसंघातील सर्व जबबादीर वर्षा पटेल सांभाळतात. तसंच मतदारसंगातील सर्व कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळे मतदारसंघात त्या परिचयाच्या आहेत. त्यामुळे त्यांचं नाव आघाडीवर आहे.

माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे चिरंजीव विजय शिवणकर यांचंही नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आहे. मुळचे भाजपचे असलेले शिवणकर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवणकर हे कुणबी समाजाचे आहेत. मतदारसंघात सर्वात जास्त संख्या ही कुणबी समाजाची आहे. त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. तसंच भाजपचा उमेदवार हा कुणबी समाजाचा नसण्याची शक्यता आहे. त्याचाही फायदा शिवणकर यांना होऊ शकतो. त्यामुळे  विजय शिवणकर यांचं नाव आघाडीवर आहे.

भाजपकडून माजी खासदार शिशुपाल पटले, खुशाल बोपचे आणि विधान परिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे परिणय फुके यांची नावं आघाडीवर आहेत. पटले आणि खुशाल बोपचे हे पोवार समजाचे आहेत. या समाजाची मतदारसंख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मतदारसंघात शिवसेनेची फारशी ताकद नसली तरी त्यांची मतेही निर्णय ठरु शकतात. त्यामुळे शिवेसना काय भूमिका घेते यावर बरच काही अवलंबून आहे. स्थानिक शिवसेना नेते भाजपाला मदत करण्यास फारसे इच्छुक नाहीत अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. बसपा उमेदवार उभा करणार का याकडंही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS