नागपूर – विधानसभेत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची अनोखी युती पहावयास मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. उसाच्या प्रश्नांवर अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला एकनाथ खडसेंनी साथ दिली आहे. त्यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी साखरेवर आयात शुल्क आकारण्याची मागणी केली आहे.
दरम्यान पाकिस्तानमध्ये साखरेचे उत्पादन मोठ्याप्रमाणात झाले आहे त्यामुळे त्यांनी साखरेला अनुदान दिलं आहे. त्यामुळे तिथली साखर आपल्या देशात मोठ्याप्रमाणात येईल आणि इथले साखर कारखाने अडचणीत येतील असंही त्यावेळी अजित पवार म्हणाले. त्यावेळी अजित पवारांच्या बाजूनं बोलताना एकनाथ खडसेंनी ऊस घेण्याबाबत कारखान्यांना अंतराची घातलेली अट रद्द करण्याची मागणी केली. तसेच आयात – निर्यात धोरणंही वारंवार बदलत असून सरकारच्या या भूमिकेमुळे मागील वर्षापासून साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी कारखाने बंद होतील आणि मग शेतकर्यांनी ऊस कुठे घालायचा असा सवालही त्यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.
एकूणच आज विधानसभेत एकनाथ खडसे आणि अजित पवार यांची युती पहायला मिळाली आहे. या दोघांच्या युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
COMMENTS