शेतक-याची आत्महत्या, विजय शिवतारे, गिरीष बापटांवर गुन्हे दाखल करण्याची आत्मत्येपूर्वी मागणी !

शेतक-याची आत्महत्या, विजय शिवतारे, गिरीष बापटांवर गुन्हे दाखल करण्याची आत्मत्येपूर्वी मागणी !

पुणे – इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यमन संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसून पिके जळत असल्यामुळे विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली आहे. पवार यांनी आत्महत्येपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीच्या औषधे व खतांचे दुकान आहे.तसेच त्यांची लासुर्णे व बेलवाडी परीसरामध्ये शेती आहे. शनिवार(ता.२१) रोजी ते दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. काल रविवार(ता.२२) रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदार वस्तीजवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा दिसून आला. पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्या आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षापासुन उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाली आहेत. कर्जबाजारी झाल्यामुळे, आर्थिक अडचणीमध्ये आल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी लिहिले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी होले,महेंद्र फणसे करीत आहेत.

 कुंटूबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी सरकारच्या विरोधातामध्ये  आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.

 जलसंपदा विभागाचा गलथान कारभार 

जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे गतवर्षी लासुर्णे, बेलवाडी परीसरातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळाले नव्हते.यामुळे या परीसरातील सात हजार एकरातील पिके जळून खाक झाली होती. यावर्षीही कालव्यातुन पाणी मिळण्यास विलंब होत आहे. वसंत पवार यांच्यासह  या परीसरातील शेतकऱ्यांनी १३ एप्रिल रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी  १७ व १९ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी पाणी सोडले नसल्यामुळे पिके जळण्यास सुरवात झाली आहे.

COMMENTS