बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला तीन तास ठेवले कार्यलयात कोंडून

बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला तीन तास ठेवले कार्यलयात कोंडून

शेतकऱ्यांच्या तूर खरेदीच्या प्रश्नावर प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत अकोल्यातील जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱयाला तीन तास कार्यलयात कोंडले होते. तुरीचा थकीत चुकारा न दिल्यामुळे या अधिकाऱयाला कडू यांनी कार्यलयात कोंडुन ठेवले होते.

शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नसून जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडून तुरीचे मोजमाप आणि ज्या शेतकऱ्यांची तूर मोजली त्यांचे पैसे वितरणाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी आज थेट जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मार्केटींग अधिकाऱ्यांना घेराव घालत कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी होईपर्यंत आणि ज्यांची खरेदी झाली त्यांना पैसे मिळेपर्यंत कार्यालय सोडत नसून मार्केटींग अधिकारी बजरंग ढाकरें  यांच्यासह स्वतःलाही कार्यालयात कोंडून घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर अधिकाऱयाची सुटका करण्यात आली. अकोला जिह्यातील तुरीच्या थकीत चुकाऱयाचे 20 कोटी रूपये उद्याच मिळणार आहे. तर अमरावती विभागातील थकीत 74 कोटी 10 जुलैपर्यंत मिळतील, असे आश्वसने मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

 

COMMENTS