तावडेसाहेब याकडे लक्ष द्या !, चूक नसताना गरीब विद्यार्थ्यावर होतोय अन्याय !

तावडेसाहेब याकडे लक्ष द्या !, चूक नसताना गरीब विद्यार्थ्यावर होतोय अन्याय !

बार्शी -राज्य शासनाच्या नवीन शाळा प्रवेश नियमानुसार शाळेपासून 1 किमी अंतरावरील विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश देणं बंधनकारक आहे. हे अंतर शासनाच्या सांकेतिक स्थळावरून गुगल मॅप या अप्लिकेशनचा वापर करून निश्चित केल जातं. बार्शी शहरातील भीमनगर या भागातील विद्यार्थ्याला या प्रक्रिया पद्धतीचा मात्र फटका बसला आहे. बार्शी शहरातील नामांकित सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भीमनगर येथील बोकेफोडे सोहम विनोद या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा जवळ असल्याने प्रथम प्रवेश तत्वावर ऑनलाईन अर्ज केला. अर्ज भरताना शाळा व विद्यार्थ्यांचं रहिवासी ठिकाण यातील अंतर अक्षांश व रेखांश पद्धतीने गुगल मॅप या अप्लिकेशनद्वारे अचूक टिपलं जात. इथे मात्र शाळेच्या कंपाऊडच्या शेजारी असलेले विद्यार्थाचे घर आणि शाळा यांच्यातील अंतर सुमारे 67 किमी दाखवले गेले आहे.

त्यामुळं या विद्यार्थ्याला प्रथम फेरीतील नियमानुसार 1 किमी पेक्षा जास्त अंतर असलेल्या प्रवेश नाकारण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सदोष कार्यप्रणालीमुळे या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने या बाबत योग्य पावलं उचलून बोकेफोडे सोहम विनोद याला प्रवेश द्यावा अशी मागणी त्याच्या पालकांनी केली आहे. गटशिक्षण अधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे सोहमच्या पालकांनी तक्रार केली आहे. मात्र अजून सोहमला न्याय मिळू शकलेला नाही. त्याची चूक नसतानाही त्याला शिक्षणापासून वंचित रहावं लागतंय. यासह राज्यातील इतर ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाला शिक्षणमंत्र्यांनी वाचा फोडावी अशी विनंती सोहमच्या पालकांनी केली आहे.

COMMENTS