शासकीय महापुजा मानाचे वारकरी करणार – मुख्यमंत्री

शासकीय महापुजा मानाचे वारकरी करणार – मुख्यमंत्री

मुंबई – आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापुजा हे मानाचे वारकरी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या महापुजेला सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच राज्यातील इतर मंत्री उपस्थित राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पुजेला पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पुजा केली जाते मात्र यावर्षी ही पुजा मानाचे वारकरीच करतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आषाढी एकादशीची शासकीय पुजा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी परंपरा आहे. मात्र, यावर्षी काही संघटनांनी मी पुजा करायला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका चुकीची असून वारकऱ्यांना वेठीस धरुन अशा मागण्या करणे योग्य नाही. तसेच विठ्ठलाची पुजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. परंतु १० लाख लोकांच्या जीवाला धोका असल्याने मी न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  तसेच या वारीला आणि भागवत धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संरक्षण दिले होते. मात्र, आता काही लोक यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मला महापुजेसाठी पंढरपुरात जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS