पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उदयनराजेंसह 13 नेते करणार भाजपात प्रवेश?

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उदयनराजेंसह 13 नेते करणार भाजपात प्रवेश?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. आता 31ऑगस्टरोजीही काही नेते भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार असून यावेळी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह एकूण 13 नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आहेत. त्यामुळे राजेंच्या या पक्षप्रवेश सोहळ्याला स्वत: पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित होत नसल्याने उदयनराजे आणि धनंजय महाडिक यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. आता  31 ऑगस्ट रोजी मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे मोदी 31 ऑगस्ट रोजी सोलापुरात आले तर यावेळी उदयनराजे आणि धनंजय महाडिक यांच्यासह 13 नेते भाजपात जाणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.

धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीसह काँग्रेसमधीलही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. तरी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहकार्य न केल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. त्यामुळे ते भाजपात जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS