डावलले जात असल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनाचा मोठा गट नाराज? संपर्कप्रमुखांच्या अधिकारांवर ‘समन्वया’ची गदा!

डावलले जात असल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनाचा मोठा गट नाराज? संपर्कप्रमुखांच्या अधिकारांवर ‘समन्वया’ची गदा!

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दुफळीचे वातावरण आत्ता दिसू लागलेले आहे. याचा फटका कदाचित लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये चर्चिली जाऊ लागली आहे.

या तीनही मतदारसंघाच्या समन्वयाची जबाबदारी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोर्‍हे यांच्यावर पक्षाने सोपवलेली आहे. पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून संजय राऊत आणि सहसंपर्कप्रमुख बाळा कदम यांना पक्षाची धोरणे ठरवण्यासंदर्भातील अधिकार शिवसेनेने दिल्याचे समजते. परंतु,समन्वयाची जबाबदारी असताना नीलम गोर्‍हे या संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख यांना विश्वासात न घेता परस्पर त्यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत असल्यामुळं पुणे जिल्ह्यामध्ये स्पष्टपणे दोन गट दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या संपर्कप्रमुखांच्या संपर्कातला गट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना मदत करायची की नाही या संभ्रमामध्ये असल्याचे समजते.

आ. नीलम गोर्‍हे यांच्याशी संबंधित असलेला गट हा समन्वयाच्या जबाबदारीबरोबरच भाजपशी सलगी करून त्यांच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप दुसऱ्या गटाने त्यांच्यावर लावला आहे. आम्ही युतीचा धर्म निश्चितपणे पाळू पण पक्षाला अपेक्षित असलेले काम पक्षाच्या धोरणानुसारच चालले पाहिजे या भूमिकेवर शिवसैनिकांचा हा गट ठाम आहे. त्यामुळे पक्षात निर्माण झालेली ही दुफळी जर वेळीच दूर नाही झाली, तर तीनही लोकसभा मतदारसंघात याचा फटका बसू शकतो. त्यामुळे पुण्यात भाजपाचे उमेदवार गिरीश बापट मावळमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांपुढे अंतर्गत कलहाचे आव्हान उभे राहिल्याचे दिसते.

अशा पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्ष प्रमुखांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून, त्यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी नाराज झालेल्या शिवसेनेच्या गटाने केली आहे. अन्यथा सध्या झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या संपर्कप्रमुख यांच्या निदर्शनास आणून देऊन त्या रद्द केल्या जातील व नव्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघांचा समन्वयाची जबाबदारी सोपवली जाईल, असा असा इशारा शिवसेनेच्या या गोटातून दिला गेल्याचे समजते.

COMMENTS