परळी विधानसभेच्या मैदानात शिवसेनेचाही उमेदवार, तिरंगी लढतीमुळे निवडणूक गाजणार !

परळी विधानसभेच्या मैदानात शिवसेनेचाही उमेदवार, तिरंगी लढतीमुळे निवडणूक गाजणार !

बीड –  परळी विधानसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनेचाही उमेदवार मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी दिली आहे. ‘मातोश्री’वरुन हाच संदेश मी घेऊन आलो असल्याची घोषणा साबणे यांनी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार विरुद्ध ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे.

दरम्यान दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मागील निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता. शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रात शिवसंपर्क मोहीम राबवली जात आहे. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना साबणे यांनी परळी मतदार संघातून शिवसेना निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भावा-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळत असून शिवसेनेने केलेल्या या घोषणेमुळे आता या लढतीमध्ये भर पडणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS