राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, फौजिया खान तूर्तास वेट अँड वॉचच्या भूमिकेत !

राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, फौजिया खान तूर्तास वेट अँड वॉचच्या भूमिकेत !

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.

m

परंतु काँग्रेस चौथ्या जागेसाठी अजूनही आग्रही असल्यामुळे याबाबत समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज फक्त पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच काँग्रेस आणि शिवसेनेनं अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु समन्वय समितीच्या बैठकीनंतर दोन्ही पक्ष आपला उमेदवार जाहीर करतील असं बोललं जात आहे.

दरम्यान भाजपकडून एकनाथ खडसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. तर रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले उद्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

COMMENTS