संभाजी ब्रिगेडच्या पहिल्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फुटला, विधानसभेच्या 100 जागा लढवणार!

संभाजी ब्रिगेडच्या पहिल्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फुटला, विधानसभेच्या 100 जागा लढवणार!

उस्मानाबाद – राज्यातील विधानसभेच्या 100 जागा लढविण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडनं घेतला आहे. तसेच उस्मानाबाद विधानसभेचे उमेदवार डॉक्टर संदीप तांबरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्यावतीने राज्यातील विधानसभा उमेदवार जाहीर करत त्या विधानसभा उमेदवाराचा प्रचार देखील सुरू केला आहे.

उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार डॉ संदीप तांबरे यांच्या प्रचारासाठी शनिवारी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली कळंब शहरात रॅली काढून मेळावा घेत प्रचाराचा नारळ फोडला. राज्यात संभाजी ब्रिगेड 100 जागा लढवणार असून कोणासोबतही सध्याच्या परिस्थितीत युती करणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.

दरम्यान राज्य शासनाणे गडकिल्ल्यांबाबत जो निर्णय घेतला होता तो दुर्दैवी असून केंद्रापासून ते राज्यापर्यंत खाजगीकरण करण्याकडे हे सरकार झुकले असून दिल्लीचा लाल किल्ला ही यांनी भाडेतत्त्वावर विकायला काढला असल्याची टीका सौरभ खेडेकर यांनी केली. गड किल्ल्याचा निर्णय हा जनरेट्यामुळे माघारी घेतला असून पुढं जर असे निर्णय घेतले तर प्रत्युत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सक्षम असल्याचा दावा ही खेडेकर यांनी केला आहे.

COMMENTS