त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली – पंकजा मुंडे

त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली – पंकजा मुंडे

पुणे – मानवी शरीरात जशा रक्तवाहिन्या असतात, तसे रस्ते हे एकप्रकारे विकासाच्या वाहिन्याच असतात, रस्ते सुधारल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही, हे गृहीत धरून आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. आज हया योजनेमुळे ग्रामीण महाराष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला असून येत्या कांही दिवसात संपूर्ण रस्ते चकाचक होतील असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले.

हवेली तालुक्यातील विविध गावांमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामाच्या २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज झाले. भूमिपूजना नंतर कदमवाकवस्ती (पालखीस्थळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, भगवान शेळके, दादासाहेब सातव, युवा नेते चित्तरंजन गायकवाड, सरपंच गौरी गायकवाड, आश्विनी गायकवाड, कविता शहरकर, संगीता गडदे आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आम्ही सत्तेत येण्यापूर्वी ग्रामीण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होती. ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर रस्ते चांगले असणे आवश्यक आहे त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आम्ही सुरू केली. ग्रामीण भागात तीस हजार किमी लांबीचे रस्ते करण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे. या योजनेला गती देवून त्यातील ६ हजार ४८३ किमी लांबीचे रस्ते पुर्ण केले तर ९ हजार ५४० किमी रस्ते प्रगतीपथावर आहेत.या योजनेमुळे ग्रामीण भाग आता हळूहळू विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहे.

नीर-नारी सुखी करण्यावर भर

ज्या समाजात नीर (पाणी) आहे व नारी (स्त्री) सुखी आहे तो समाज सर्वथा सुखी असतो. पाण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवली. नदी पुनरुज्जीवन, खोलीकरण आदी जलसंधारणाची चार हजार कोटीची कामे आपण जलसंधारण मंत्री असतांना राबवली. ही योजना पाणी अडविण्यासाठी होती पण यंदा निसर्गाने साथ दिली नाही त्यामुळे दुष्काळ जाणवत आहे, विरोधक या योजनेवर करत असलेली टीका ही निरर्थक व तथ्यहीन असल्याचे त्या म्हणाल्या. नारीला सुखी करण्यासाठी तिचा सन्मान व संरक्षण यावर भर दिला. माझ्याकडे असलेल्या विभागाने महिला बचतगटांना शुन्य टक्के दराने कर्ज, अतिक्रमण नियमित करण्याचे धोरण, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ, शिक्षकांच्या बदल्या, बेटी बचाव बेटी पढाव, माझी कन्या भाग्यश्री आदी योजना यशस्वीपणे राबवल्या असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझं कार्य वंचितांसाठी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे या भागातील जनतेशी ऋणानुबंध होते. हा भाग पं. महाराष्ट्रात असल्याने नेहमी सत्तेत होता परंतु याकडे तत्कालीन सत्ताधा-यांनी दुर्लक्ष केले. असे असले तरी आपण सत्तेत आल्यानंतर येथे विकासाची कामे सुरू केली असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी जनतेच्या विकासाचं जे स्वप्न पाहीलं होत ते मी पुर्ण करण्याचा विडा उचलला आहे. माझं खातं हे वंचितांचं खातं आहे, त्यामुळे त्यांच्याप्रमाणं वंचितांचं वाली आणि वाणी बनण्याचा माझा प्रयत्न आहे तरच त्यांच्या नांवाच सार्थक होईल असे त्या म्हणाल्या.

स्वागतासाठी मोठी गर्दी

या दौ-यात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील राज्यमार्ग ९ ते कवडीपाट १.३५ कोटी, राज्य महामार्ग ते सोरतापवाडी ते शिरोळे वस्ती ३.९६ कोटी, राज्य महामार्ग ते खटाटे वस्ती ते पेठगांव १.१२ कोटी तसेच शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रूरबन अभियान १.८५ कोटी व लोणी काळभोर येथे ग्रामविकास विभागाची इतर कामे अशा एकूण २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला. गांवोगांवी त्यांचे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले. शेतकरी मेळाव्यासही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS