‘हे’ दहा खासदार निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज!

‘हे’ दहा खासदार निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीमध्ये 44 जागांवर शिक्कामोर्तब झालं असून उरलेल्या चार जागांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. या जागांवरीलही तिढा लवकरच सुटणार असल्याचं बोललं जात असून दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आठ उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत चाचपणीत दहा जागांवर उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान या दहा जणांमध्ये पाच विद्यमान खासदारांचा समावेश असून बारामती (सुप्रिया सुळे), माढा (विजयसिंह मोहिते-पाटील), कोल्हापूर (धनंजय महाडिक), सातारा (उदयनराजे भोसले), भंडारा-गोंदिया (मधुकर कुकडे) या मतदारसंघातील खासदार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला असल्याची माहिती आहे.

याचबरोबर रायगडची जागा सुनील तटकरे खेचून आणतील तर मावळमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. शिरुर, बुलढाणा, परभणी या जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वरिष्ठांना वाटत असल्याची माहिती आहे.

तर शिरुरमधून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा असून बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचं नाव निश्चित असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या किमान दहा जागांवर विजय मिळेल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या दहा जागांवरील काही नावं निश्चित झाले नसून यामध्ये बदलही होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS