मोदींना  नीच म्हणणा-या काँग्रेस नेत्यावर पक्षाची कारवाई

मोदींना नीच म्हणणा-या काँग्रेस नेत्यावर पक्षाची कारवाई

दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना महागात पडलं आहे. मणिशंकर अय्यर यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेसने रद्द केलं आहे. मणिशकंर अय्यर यांनी मोदींना उद्देशून ‘नीच प्रवृत्तीचा माणूस’ असे शब्द वापरले होते. अय्यर यांनी मोदींकडे किमान सौजन्य नसल्याची टीकाही केली होती.. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केलं असून या राजकारणाची काय गरज होती?,’ असा प्रश्नही अय्यर यांनी केला होता.

गुरुवारी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या केंद्राच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. ‘राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते.

मोदींच्या या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी जोरदार उत्तर देत ‘हा अतिशय नीच प्रकारचा माणूस असल्याची टीका त्यांनी केली होती. या टीकेनंतर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत  अय्यर यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेसने रद्द केलं आहे. तसेच राहुल गांधींनीही अय्यर यांची कानउघडणी करत हा काँग्रेसचा वारसा नसल्याचं ते म्हणालेत.

 

COMMENTS