भाजप नेते अन् मुख्यमंत्र्यांमध्ये कमराबंद चर्चा

भाजप नेते अन् मुख्यमंत्र्यांमध्ये कमराबंद चर्चा

मुंबई : भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यापासून दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. दररोज वेगवेगळ्या विषय़ांवर दोन्ही पक्षांचे नेते आरोपप्रत्यारोप करून समोरच्याची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. दरम्यान, आज अचानक सह्याद्री अतिथीगृहात भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये कमराबंद चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडीवर टीका करत होते. प्रामुख्याने ते शिवसेनेवर निशाणा साधत होते. परंतु, आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यात साधारण 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड बैठक पार पडली. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तसेच आता काहीच दिवसांत राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असावी, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बैठक संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितलं की, “आजची बैठक ही माझ्या मतदार संघातील अनेक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांना राजकीय अर्थ काढायचा आहे, त्यांना काढू द्या. जर काही झालंच तर चांगलंच होईल की.” पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “सध्या निवडणुका समोर ठेऊन काही राज्यांना निधी देण्यात आला आहे, असा आरोप केला जातोय. यामध्ये मी एक बाब स्पष्ट करतो की, केवळ त्या राज्यांची नावं घोषित करण्यात आली. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त निधी हा महाराष्ट्राला मिळाला आहे.”

COMMENTS