कोंबड्यांचे पंचनामे करा, मृत जनावरं पोस्टमार्टमसाठी शहरात घेऊन या !

कोंबड्यांचे पंचनामे करा, मृत जनावरं पोस्टमार्टमसाठी शहरात घेऊन या !

जालना –  अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानामुळे शेतक-यांचं कंबरडं मोडलं असून आता शेतक-यांना मदत करायची सोडून त्यांची थट्टा प्रशासन आणि सरकारकडून केली जात असल्याचं उघड झालं आहे. गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे पोस्टमार्टम केल्याशिवाय मदत मिळणार नसल्याचं प्रशासकीय अधिका-यांनी म्हटलं आहे तर जे जनावरं मृत जाले आहेत त्यांचं पोस्टमार्टम करायचं असेल तर त्यांना शहरात घेऊन या असंही या अधिका-यांनी शेतक-यांना म्हटलं आहे. या जनावरांचा चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्यामुळे ते आता शहरात कसे घेऊन जायचे असा प्रश्न आता शेतक-यांना पडला आहे. तसेच या गारपीटीमुळे काही शेतक-यांकडली कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांचाही पंचनामा करण्यासाठी मृत कोंबड्यांना घेऊन या असं प्रशासकीय अधिका-यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याला मदत करतय की जखमेवर मीठ चोळतंय असा सवाल आता गारपीग्रस्त शेतकरी करत आहे.

प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. ७२ तास उलटूनही गारपिटीत मृत्यू पावलेल्या जनावरांचे पंचनामे आणि पोस्टमार्टम अद्याप केले नाहीत सरकारचा कारभार म्हणजे उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गारपिटीत मृत पावलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करण्यास तलाठी सांगत आहेत. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जालण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना भेटून तलाठ्याला समज देऊन तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाच्या आणि सरकारच्या या कारभारावर शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सरकारला आणि प्रशासनाला आमचीही काहीही पडली नसल्याचं शेतकरी म्हणत आहेत. त्यामुळे राज्याचा कारभार हाकणा-या सरकारला आता तरी जाग येणार का असा सवाल हे शेतकरी करत आहेत.

 

COMMENTS