लातूरात फडणवीस, देशमुख अन शिवसेनेत फिक्सिंग?

लातूरात फडणवीस, देशमुख अन शिवसेनेत फिक्सिंग?

लातूर – विधानसभेच्या निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदरासंघाची जागा शिवसेनेला सोडली, तेव्हा मला वेदना झाल्या, एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे माझ्या डोळ्यातून पाणी आल्याचे सर्वांनी पाहिलं असेल. ती जागा फिक्सिंग झाली होती. फिक्सिंग करणारे हाय लेव्हलचे नेते होते” असा गंभीर आरोप भाजचे माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांनी केला. यावरून लातूरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व शिवसेना यांच्यामध्ये फिक्सिंग झाले होता अशी चर्चा रंगत आहे.

लातूर ग्रामीणची जागा परंपरागतपणे भाजप लढवत आली आहे. लातूर ग्रामीणमधून 2014 साली पंकजा मुंडे समर्थक रमेश कराड हे थोड्या फरकाने पडले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण फडणवीसांच्या पीए राहिलेल्या अभिमन्यू पवार यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी औशाची निवड केली. मग ती जागा भाजपानं शिवसेनेला सोडली आणि शिवसेनेची औशाची जागा भाजपसाठी घेतली.
औशातून देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार उभे राहिले आणि निवडूनही आले. त्यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे आमदार बस्वराज पाटील यांचा पराभव केला.

औशाची जागा परंपरागतपणे शिवसेना लढवते. दिनकर माने हे तिथं शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुखांचे पुत्र आणि मंत्री अमित देशमुखांचे बंधू धीरज देशमुख यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेने सचिन देशमुख हा फारसे परिचित नसलेला उमेदवार दिला. लातूर ग्रामीण आधी भाजपने सोडला, नंतर तिथे शिवसेनेने दुबळा उमेदवार दिला. परिणामी अमित देशमुखांचे बंधू धीरज निवडून आले. पण त्या बदल्यात अमित देशमुखांनी काय केलं? तर त्याचं उत्तर आहे औसा. तिथे फडणवीसांचे पीए अभिमन्यू पवारांना निवडून आणण्यासाठी अमित देशमुखांनी मदत केल्याची त्यावेळेसही उघड चर्चा होती आणि आता संभाजी पाटलांनीही ते सुचित केले. म्हणजे फडणवीसांच्या पीएसाठी इथं फिक्सिंग झाली असं तर संभाजी पाटील-निलंगेकर यांना सुचवायच नाही ना ?

COMMENTS