धनंजय महाडीक आणि सतेज पाटलांमध्ये पुन्हा शह काटशहाचे राजकारण ?

कोल्हापूर – राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक आणि आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये पुन्हा शह काटशहाचे राजकारण रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाडीक यांनी आयोजित केलेल्या कृषी-पशु पक्षी प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी तसे लेखी आदेश काढले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची सत्ता आहे, त्याचे नेतृत्त्व आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील करतात. या दोघांचे सद्यस्थितीत खासदार महाडीक यांच्याशी मतभेद आहेत. त्यातूनच हा ठराव करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

गेली अनेक वर्षांपासून महाडीक यांच्याकडून मेरी वेदर मैदानावरच हे प्रदर्शन भरवले जाते. गेल्यावर्षीही याच मैदानावर हे प्रदर्शन झाले होते. पण त्यानंतर 20 मार्च 2017 रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे मैदान खेळा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी न देण्याचा ठराव करण्यात आला आहे. आता याच मैदानावर हे प्रदर्शन घेण्याचा चंग श्री. महाडीक यांनी बांधला असून याबाबतची मागणी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे महाडिक यांनी केली असून जिल्हाधिकारी यांनाही हे अधिकार नसल्याने त्यांच्याकडून हा अर्ज राज्याच्या महसूल सचिवांकडे पाठवण्यात येणार आहे. अलिकडे खासदार महाडीक यांची महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी वाढलेली जवळीक, आमदार अमल महाडीक हे भाजपाचे असल्याने ही ताकद वापरून श्री. महाडीक यांचे या प्रदर्शनासाठी मैदान मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  त्यामुळे महाडिक यांना यावर्षी प्रदर्शनासाठी हे मैदान मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS