मुख्यमंत्री कार्यालयातील माहिती देण्यास टाळाटाळ, अधिका-याला 25 हजारांचा दंड !

मुख्यमंत्री कार्यालयातील माहिती देण्यास टाळाटाळ, अधिका-याला 25 हजारांचा दंड !

मुंबई –  माहिती अधिकारात योग्य माहिती न दिल्याबद्दल माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्री कार्यालयातील जन माहिती अधिकाऱ्याला 25 हजार रुपयांचा दंड  ठोठावला आहे. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे मागवलेली माहिती त्यांना न दिल्याबद्दल राज्य माहिती आयुक्त अजित कुमार जैन यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील जन माहिती अधिकारी अनघा साठे यांना हा दंड ठोठावला आहे. राज्य सरकारच्या पोर्टलवर  ऑनलाईन आलेल्या तक्रारी आणि त्यावर झालेली कारवाई याची माहिती आणि सीडी गांधी यांनी माहिती अधिकारात 13 नोव्हेंबर 2015 रोजी मागवली होती.  मात्र ही माहिती देण्याचे सोडून त्यांना एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले.

शैलेश गांधी यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे पहिला अर्ज केला होता. ही माहिती आपल्याकडे नसल्याचे कारण सांगत तो अर्ज पुढे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला. मात्र 4 डिसेंबर 2015 रोजी हा अर्ज पुन्हा सामान्य प्रशासन विभागाकडे परत आला. ऑनलाईन पोर्टल तंत्रज्ञान विभागाने तयार केल्याचे कारण देऊन 2 जानेवारी 2016 रोजी सामान्य प्रशासन विभागाने हा अर्ज तंत्रज्ञान संचालकांकडे पाठवला. पाच महिन्यानंतर गांधी यांना मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती देण्यात आली. मात्र त्या माहितीबाबत गांधी समाधानी नव्हते. त्यांनी 2 एप्रिल 2016 रोजी माहिती आयुक्तांकडे याबाबत अपिल दाखल केलं. गांधी यांचा पहिला अर्ज दाखल झाल्यानंतर आता दोन वर्षांनी याबाबत माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

COMMENTS