‘त्या’ लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचं वर्चस्व, तरीही उमेदवार निवडीसाठी भाजपची दमछाक !

‘त्या’ लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचं वर्चस्व, तरीही उमेदवार निवडीसाठी भाजपची दमछाक !

कोल्हापूर – लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. तरीही आगामी निवडणुकीत लोकसभेसठी उमेदवार शोधण्यास भाजपची दमछाक होत असल्याचं दिसत आहे. भाजपची ही परिस्थिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरु आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा जागांपैकी पाच जागा भाजप-शिवसेना युतीकडे, तर एक जागा राष्ट्रवादी- काँग्रेसकडे आहे.

एवढच नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका तसेच बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजप-शिवसेना युतीचा वरचष्मा आहे. तरीही याठिकाणी लोकसभेसाठी भक्कम उमेदवार देण्यास भाजपला जड जात आहे. कारण या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांची मागील दोन टर्मपासून पकड मजबूत आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली किंवा नाही झाली तरी देखील याठिकाणी भाजपला उमेदवार द्यावा लागणार आहे. अशातच आगामी निवडणुकीसाठी युतीची साथ सोडून राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजू शेट्टी यांची ताकद आणखी वाढली आहे.  २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेच्या मदतीने खासदार शेट्टींनी काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासारख्या साखरसम्राटांचा पराभव केला होता.

त्यामुळे आगामी निवडणुकीत राजू शेट्टी यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरु आहे. सध्या तरी लोकसभेसाठी भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे नाव आघाडीवर आहे. महाडिक यांची सहाही विधानसभा मतदारसंघांत स्वत:ची ताकद आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना महाडिक टक्कर देतील का? किंवा त्यांच्याऐवजी भाजप इतर कोणाला उमेदवारी देणार? याकडे या मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS