परळी मतदारसंघात एक लाख नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग,  मुंबईबाहेर पहिल्यांदाच होणार असा उपक्रम !

परळी मतदारसंघात एक लाख नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग, मुंबईबाहेर पहिल्यांदाच होणार असा उपक्रम !

परळी – कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई येथील प्रसिद्ध ‘वन रूपी क्लिनिक’मार्फत परळी मतदारसंघात येत्या १७ एप्रिलपासून घरोघरी नागरिकांचे थर्मल टेस्टिंग केले जाणार आहे.

धनंजय मुंडे यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, नागरिकांतून या टेस्टिंग बाबत होत असलेल्या मागण्या यांचा विचार करून वन रुपी क्लिनिक चे डॉ. राहुल घुले यांना पत्र लिहून व दूरध्वनीवरून संपर्क करून याबाबत मागणी केली होती. त्यानुसार डॉ. घुले यांनी मुंबई बाहेर अशा स्वरूपाची पहिली वहिली टेस्टिंग करण्याचे मान्य केले असून येत्या १७ तारखेपासून तज्ञ १० डॉक्टर्सची टीम घरोघरी जाऊन ही टेस्टिंग करणार आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या भयावह संकट काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वैद्यकीय चाचणी करून भीती दूर करणे तसेच आवश्यक त्या नागरिकास वेळीच वैद्यकीय सेवा मिळवून देणे या उद्देशाने येत्या १७ एप्रिलपासून घरोघरी जाऊन ही टीम नागरिकांची थर्मल टेस्टिंग (वैद्यकीय तपासणी) करणार आहे.

नुकताच वन रूपी क्लिनिक च्या टीम ने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात अशा १ लाख २३ हजार नागरिकांची तपासणी केली असून ताप, खोकला यासह विविध लक्षणे आढळलेल्या जवळपास २०० नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले.

आता मुंबई बाहेर अशा स्वरूपाची टेस्टिंग करण्याची ही पहिलीच वेळ असून परळी मतदारसंघातील जनतेसाठी ही टेस्टिंग केली जात आहे, यामध्ये नागरिकांनी स्वतःहून पुढे येत निसंकोच टेस्टिंग करून घ्यावी व भयमुक्त रहावे असे आवाहन नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS