राज्य सरकार मुंबईकरांचा अंत पाहत आहे – अजित पवार

राज्य सरकार मुंबईकरांचा अंत पाहत आहे – अजित पवार

नागपूर – गेली काही दिवसांपासून मुंबईमध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असल्याचं पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा उचलत आज विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हवामान विभागाने आणखी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परंतु पालिका आणि राज्य सरकार हे मुंबईकरांचा अंत पाहत आहेत का ? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. तसेच मुंबईत विविध घटना घडल्या असून मुंबईकरांचा जीव जात आहे. सरकारला समजायला पाहिजे की पावसाळ्याआधी आढावा बैठक होते. सर्व विभागाची लोकं असतात, हे विभाग काम नीट चाललं आहे का हे बघायचे असते.परंतु प्रशासनानं तसं केलं नसल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.

दरम्यान मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी जी खबरदारी घ्यावी लागते त्यामध्ये सरकार कमी पडत आहे. काही मंत्री दिसत नाहीयत, कुठे आहेत ते माहित नाहीत. सत्ताधारी पक्षातील आमदारांना सभागृहात यायला वेळ नाही, भटकायला वेळ असल्याची जोरदार टीकाही यावेळी अजित पवार यांनी केली आहे.

मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मुंबईत वेगवेगळ्या दुर्घटना घडतात आणि महापालिका आणि सरकार कुणाचे हा प्रश्न उपस्थित केला जातो. मुंबईकरांचे धैर्य वाढवण्याची गरज असून चाकरमानी नोकरीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब पावलं उचलावीत अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

आज शाळा चालू राहणार – विनोद तावडे

दरम्यान मुंबईतील पावसाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली असून मुंबईत पाऊस पडत आहे, हवामान विभागाचा हा अतिवृष्टी इशारा नसल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे. तसेच भरतीची वेळ सकळी होती, आता रात्री आहे. त्यामुळे आज शाळा – महाविद्यालयांना सुट्टी देण्याची गरज नाही. तसेच विरोधकांनी काम करण्याचा सल्ला देण्याची गरज नाही. सर्व यंत्रणेतर्फे योग्य ती पावले उचलली जात असल्याचंही तावडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS