सरकारचं डोकं फिरलंय का? – अजित पवार

सरकारचं डोकं फिरलंय का? – अजित पवार

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध प्रश्नांवर सरकारला चांगलं घेरलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. विधानसभेत दुधाच्या दरावरून अजित पवार यांनी सरकारला सुनावलं आहे. दुधाचा दर २७ रुपये ठरवणा-यांचं डोकं फिरलं आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. २७ रुपये दर ठेवल्यामुळे दुध संघ अडचणीत आले आहेत,  दूध संघ संपले तर दुध उत्पादक शेतकरी अडचणीत येतील असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान कर्नाटक, गोवा आणि काही राज्य दुधाला अनुदान देतात, तुम्हीही एक लिटर दुधाला ५ रुपये अनुदान द्या मग आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरू असंही अजित पवार त्यावेळी म्हणाले आहेत. तसेच पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते, आमच्या शेतकर्‍यांना दुधालाही २० रुपये दर मिळतो यावरुनही अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. मंत्र्यांना सांगितले होते बैठक घेऊ, कधी बैठक घेणार, दोन वर्षांपूर्वी बैठक झाली त्यानंतर बैठक झाली नाही त्यामुळे मंत्र्यांकडून याकडे दुर्लक्ष का केलं जात आहे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

तसेच दुध संघ दुधापासून पावडर तयार करत आहेत, ही पावडर परदेशात पाठवून दुधाची बाजारपेठ सुधारेल असं तुम्हाला वाटत आहे का? अशा प्रश्नही त्यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. आज झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित करत सरकरला धारेवर धरल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS