शिवसेना लवकरच सरकारमधून बाहेर पडणार –आदित्य ठाकरे

शिवसेना लवकरच सरकारमधून बाहेर पडणार –आदित्य ठाकरे

अहमदनगर – भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेतून बाहेर पडण्याची शिवसैनिकांची डरक्याळी आपण अनेकवेळा ऐकली आहे. विविध प्रश्नावर अनेकवेळा शिवसेना सरकारच्या विरोधात देखील उतरल्याचं आपण पाहिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वारंवार तसा इशाराही दिला गेला. परंतु आता शिवसेना एका वर्षात सत्तेतून बाहेर पडून स्वबळावर सत्तेवर येण्याचा विश्वास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्तवला आहे. गुरुवारी अहमदनगर येथे भरवण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सरकारमधून कधी बाहेर पडायचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.  मात्र, सरकारमधून बाहेर पडण्याचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज असून अपेक्षित परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, असं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी त्यावेळी केलं आहे.

त्याचबरोबर त्यावेळी बोलत असताना आदित्या ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकारमुळे शिक्षणव्यवस्थेची दुरावस्था झाली असून शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या तशाच आहेत. अनेक विद्यार्थी त्या समस्या घेऊन माझ्याकडे येत आहेत. त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबध्द असल्याचंही ते म्हणाले.

 

COMMENTS