हक्काचे पैसे मिळवण्यासाठीही ‘त्या’ शेतक-याला गाठावे लागले मंत्रालय !

हक्काचे पैसे मिळवण्यासाठीही ‘त्या’ शेतक-याला गाठावे लागले मंत्रालय !

मुंबई – अल्पभूधारक शेतक-यांना तातडीने 10 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र अनेक गरजवंत शेतक-यांनी ते 10 हजार रुपये मिळालेच नाहीत. चाळीसगावमधल्या अशाच एका शेतक-याने स्टेट बँकेकडून 30 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. देवजी साळवे असं त्यांचं नाव आहे. मात्र अडचणीमुळे साळवे ते फेडू शकले नाहीत. त्यामुळं बँकेनं त्याचं खातंच गोठवलं. पेरणीसाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्या शेतक-याच्या खात्यावर 30 हजार रुपये जमा केले. खरंतर सर्व कर्ज भरल्यानंतर त्या शेतक-याला तातडीने पुन्हा नवं कर्ज देणं गरजेचं होतं. ते तर दिल नाहीच. उलट सरकारने सर्व शेतक-यांना 10 हजार रुपये द्यावेत हा निर्णयही त्या बँकेनं जुमानला नाही. शेवटी देवजी साळवे यांनी दोन दिवसांपूर्वी थेट मंत्रालय गाठलं. मंत्रालयात त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेतली. त्यानंतर चक्रे वेगाने फिरली आणि देवजी यांना पेरणीसाठी पैसे मिळाले. मात्र त्यासाठी त्यांना थेट मंत्रालयात यावं लागलं. पेरणीसाठी त्यांना खूप उशीरही झाला. वटीला आणि मुठीला फरक असतो अशी गावाकडं म्हणं आहे. याचा अर्थ वेळेवर पेरणीला खूप महत्व आहे असा होतो. पण या बँकेला कोणी सांगावं आणि त्याचं त्यांना काय पडलंय असंच म्हणावं लागेल. कर्जमाफी जाहीर झाली असली तरी पदरात पडेल तेंव्हाच खरे असे म्हणण्याची वेळ या देवजी साळवे यांच्या या उदाहरणावरुन दिसून येत आहे. असे अनेक देवजी साळवे राज्यात आहेत.

 

COMMENTS