विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या शहराध्यक्षाच्या दिराचा हवेत गोळीबार !

विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या शहराध्यक्षाच्या दिराचा हवेत गोळीबार !

ठाणे – अंबरनामधील भाजपच्या महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर यांचा दिर आशिष भोईरने हवेत गोळीबार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात हवेत गोळीबार करताना आशिष भोईर स्पष्टपणे दिसत आहे.  देवीच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना हवेत दोन वेळा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. सुजाता भाईर यांच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे.

सुजाता भोईर आणि त्यांचे नातेवाईक मिरवणुकीत नाचतानाचा व्हिडिओ फेसबुकवर वायरल झाला आहे. हा व्हिडिओ 1 ऑक्टोबरचा आहे. नाचताना हवेत फायरिंग करतानाचे व्हिडिओ भोईर यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना काढण्यास सांगितले होते. एवढेच नव्हे तर हा व्हिडिओ लगेच फेसबुकवर अपलोडदेखील करण्यात आला. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुण सुजाता भोईर यांचा दिर आशिष भोईर आहे. हा सर्व प्रकार सुजाता भोईर यांच्यासमोर घडलेला असतानाही तो रोखण्याचा कोणताच प्रयत्न त्यांच्यामार्फत झालेला नाही.

या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली असता आशिष भोईर यांना बंदुकीचा परवाना देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या बंदुकीतून ही फायरिंग झाली आहे ती बंदुक परवानाधारक असल्याचे समोर येत आहे. मात्र, परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार करण्याचा किंवा सण, उत्सव किंवा लग्न समारंभात फायरिंग करणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा घडत असलेला व्हिडिओ भाजप महिला अध्यक्ष स्वतःच्या फेसबुक अकाऊंटमध्ये लोड करित असल्याने भाजप महिला अध्यक्षा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

COMMENTS