मुख्यमंत्र्यांना हमीपत्र पोहोचण्याआधीच शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यमंत्र्यांना हमीपत्र पोहोचण्याआधीच शेतकऱ्याची आत्महत्या

उस्मानाबाद – राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास आम्ही आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिणाऱ्या खामसवाडीतील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर अली आहे. आज (शुक्रवारी) पहाटे ही घटना घडली. संदिप बलभीम शेळके (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून खामसवाडीतील शेतकरी संदीप  शेळके याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्मह्त्या केली आहे. संदीपचा एक भाऊ अपंग असून आई-वडील वयोवृद्ध आहेत. घरात तो एकटाच कर्ता होता. वडील बलभीम यांच्या नावे साडेचार एकर शेती आहे. याच शेतीत त्याने ऊसलागवड सुरू केली होती. चार पाच वर्षातील दुष्काळामुळे ग्रामीण बँकेचे 80 हजार, सोसाटीचे 35 हजाराचे, भावाच्या नावे 15 हजाराचे कर्ज होते. सततची नापिकी, येणारा दुष्काळ यामुळे निराश होऊन संदीपने आत्मह्त्या केल्याचे बोलले जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना हमीपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबवली होती. सरकारने स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य केल्या तर शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी देण्यासाठी खामसवाडीतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल एक किलो मीटर लांबीचे पत्रच लिहिले. यावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या. पोस्टामार्फत दोन दिवसांत ते तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार होते. मात्र, हे हमीपत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याच्या आतच तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

 

COMMENTS