आदित्य ठाकरे आणि विखे पाटील यांची वक्तव्य काय संकेत देत आहेत ?

आदित्य ठाकरे आणि विखे पाटील यांची वक्तव्य काय संकेत देत आहेत ?

महाराष्ट्राच्या राजकारणात काल दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरुन उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झालीय. सध्याच्या मित्र पक्षापेक्षा या नेत्यांना विरोधातले नेते चांगले वाटू लागलेत. राधाकृष्ण विखे पाटील आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना त्यांच्या मित्र पक्षापेक्षा विरोधातले मंत्री आणि नेते चांगले वाटू लागलेत. काल शिर्डीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकाच स्टेजवर आले होते. विखे पाटलांची मुख्यमंत्र्यांशी असलेली मैत्री सर्वश्रूत आहेच. पण काल जरा जास्तचं एकमेकांचं कौतुक झालं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर ते ज्या मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांपेक्षा सध्याच्या फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री चांगले आहेत असं वक्तव्य केलं. आणि मला घरी आल्यासारखं वाटतंय असं बोलून राजकीय चर्चांना विषय दिला. त्यानंतर मुख्यमंत्रीही विखेंचं कौतुक करण्याचं काम त्यांच्या भाषणात केलं. विखे पाटील त्यांचं काम योग्य प्रकारे करत आहेत. ते त्यांच्या ठिकणी आणि मी माझ्या ठिकाणी सध्या आहोत. मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही असं सांगून भविष्यात काय होणार याचे संकेतच दिले. त्यामुळेच गरमागरम राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापेक्षा आधीचे शिक्षणमंत्री चांगले होते की काय ? असा प्रश्न पडलाय. कारण आधीचे शिक्षणमंत्री आणि कुलगुरू चांगले होते, ते विद्यार्थ्यांना भेटायचे, विद्याथ्यांचं ऐकायचे, मात्र सध्याचे मंत्री आणि कुलगुरू तसं वागत नाहीत. त्यामुळेच थेट राज्यपालांना हस्तेक्षेप करावा लागाला अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. कुलगुरूंना नीट कारभार करता आला नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आदित्य यांनी राजीनामा कुलुगुरुंचा मागितला असला तरी त्यांचा रोख शिक्षणमंत्र्यांकडेही होता हे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येतंय. राज्यातल्या या दोन दिग्गज नेत्यांची वक्तव्य पाहता महाराष्ट्राच्या राजकारण नवी समिकरणे तर तयार होत नाहीत ना ? अशीही चर्चा आता सुरू झालीय.

COMMENTS