…. आणि म्हणून त्यांनी मिळालेल्या सत्तेवर सोडलं पाणी

…. आणि म्हणून त्यांनी मिळालेल्या सत्तेवर सोडलं पाणी

सत्तेपेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी रोजीरोटी महत्त्वाची मानून एका महिलेने पंचायत समिती सदस्यत्वावर पाणी सोडत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ही घटना खेड तालुक्‍यातील राजगुरूनगरमध्ये घडली आहे. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या धोंडाबाई साहेबराव खंडागळे यांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

फेब्रुवारीत झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी बुद्रुक गणातून त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. धोंडाबाई खंडागळे या कोये गावाच्या भिसांबा- ठाकरवाडी या वस्तीवर अंगणवाडी सेविका आहेत. पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर नियमानुसार त्यांना अंगणवाडी सेविकापदाचा राजीनामा द्यावा लागणार होता.

निवडून आल्यानंतर सत्कार समारंभांचे आणि मानपानाचे नव्याचे नऊ दिवस संपले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि नियमित मिळणारे पाच हजार रुपये मानधन दोन महिने न मिळाल्याने, त्यांना चणचण जाणवली. त्यावरून त्यांनी भविष्यातील धोका ओळखला आणि सत्तेच्या पदापेक्षा रोजीरोटी महत्त्वाची असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आपला राजीनामा त्यांनी शुक्रवारी सभापती सुभद्रा शिंदे यांच्याकडे दिला. त्यावर साक्षीदार म्हणून पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर आणि अंकुश राक्षे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सभापतींनी राजीनामा स्वीकारून तो पुढील कारवाईसाठी तहसीलदार, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. पंचायत समिती सदस्य आणि अंगणवाडी सेविका अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत राहणे नियमानुसार शक्‍य नसल्याने आपण पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

खंडागळे या पिंपरी बुद्रुक गणातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. या गणातून अनुसूचित जमातीतील पुरुषही निवडणूक लढवू शकत होते; पण सभापतीपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने सर्व पक्षांनी येथून अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवार दिल्या होत्या. खंडागळे निवडून आल्या; पण भाजपला पंचायत समितीत बहुमत नसल्याने शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे सभापती झाल्या आहेत.

 

 

COMMENTS