जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल, या ‘आयाराम’ नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी ?

जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल, या ‘आयाराम’ नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी ?

मुंबई – राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून
निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही ‘आयाराम’ नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची माहिती आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान विखे पाटील हे दोन नंबरच्या मंत्रिपदाची म्हणजेच महसूल खात्याची मागणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महसूल खातं काढून विखेंना मिळण्याची शक्यता कमी असून पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेलं कृषी खातं विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.

तर दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी या नेत्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS