नवी दिल्ली – १९८४ मधील शीखदंगली प्रकरणी काँग्रेस नेत्याला दिल्ली हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमारला जन्म ठेपेची शिक्षा हायकोर्टानं सुनावली आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे सज्जन कुमारवर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमारला कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. परंतु या सुटकेला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या खटल्यात आज हायकोर्टाने सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सज्जन कुमारच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. जी.टी.नानावटी आयोगाने २००५ मध्ये सूचना केल्यानंतर पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जानेवारी २०१० मध्ये सीबीआयने या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. १९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत सहा व्यक्तींची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी सज्जन कुमार, ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात हत्येचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमारला दोषमुक्त करताना अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही हायकोर्टातील सुनावणीत करण्यात आला होता. त्यानंतर आज हायकोर्टानं सज्जन कुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
COMMENTS