नगरपंचायतीत राष्ट्रगीत सुरु असताना  भाजपच्या उपनगराध्यक्षांकडून शिवीगाळ !

नगरपंचायतीत राष्ट्रगीत सुरु असताना भाजपच्या उपनगराध्यक्षांकडून शिवीगाळ !

सातारा – लोणंद नगरपंचायतीत धक्कादायक प्रकार घडला असून भाजपच्या उपनगराध्यक्षांनी सभागृहात राष्ट्रगीत सुरू असताना सर्व पदाधिकाऱ्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली असल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मासिक सभेदरम्यान हा प्रकार घडला आहे. आपण दाखल केलेल्या ठरावांचे वाचन होत नाही, असा आरोप करत उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी मुख्याधिकारी अभिजित परदेशी यांना धारेवर धरले. दरम्यान, सभा संपल्याचे जाहीर करत नगराध्यक्षा स्नेहलता शेळके यांनी राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना केली. असता एका बाजूला राष्ट्रगीत सुरु होते तर दुस-या बाजूला उपनगराध्यक्ष शिवीगाळ करत होते.

दरम्यान लोकमतनं छापलेल्या बातमीनुसार, सभागृहाच्या कामकाजाचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाली असून हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. भाजप उपनगराध्यक्षांच्या या शिवीगाळीवरून सोशल मीडियावरुन जोरदार टीका केली जात आहे. लोणंद नगरपंचायतीत सतरापैकी राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक होते. भाजपच्या दोन नगरसेवकांना सोबत घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी सत्ता स्थापन केली. मात्र, स्थानिक नेते आनंदराव शेळके-पाटील यांनी आपल्या तीन नगरसेवकांना घेऊन काँग्रेससोबत पंचायतीचा कारभार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचा उपनगराध्यक्ष असूनही भाजपला सत्तेत स्थान मिळत नाही याचा राग उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी काढला असला तरी राष्ट्रगीत सुरू असताना एका महिला नगराध्यक्षाला अश्लील शिवीगाळ केली असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

 

COMMENTS