नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य ?

नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य ?

मुंबई –  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे राज्यसभेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु राज्यसभेत जाण्यास राणे यांना इच्छा नसल्याचं दिसून येत आहे. कारण नारायण राणे यांचे आमदार पूत्र नितेश राणे यांनी ट्वीट करुन ‘नारायण राणेंच्या हितचिंतकांना असे वाटते आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळासाठी रहावे, महाराष्ट्राला नारायण राणेंसारख्या नेत्याची गरज आहे. आम्हाला त्यांना विधानसभेत बघायचे आहे राज्यसभेत नाही. स्वतः नितेश राणे यांनी केलेल्या या ट्वीटमुळे नारायण राणेंना राज्यसभेवर जाण्याची इच्छा नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची ही ऑफर राणे यांना अमान्य असल्याचं दिसत आहे.

दरम्यान २३ मार्च रोजी होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून ६ जागा लढवल्या जाणार आहेत. त्यापैकी विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता भाजपाला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. त्यापैकी एक जागा नारायण राणेंना द्यायची असा प्रयत्न भाजपातर्फे सुरु आहे. परंतु अशातच नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे नारायण राणे हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS