“1 मार्चपासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार !”

“1 मार्चपासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार !”

औरंगाबाद – राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. 1 मार्चपासून विविध  मागण्यांसाठी असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय शेतक-यांनी घेतला आहे. औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत रघुनाथदादा पाटलांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. शेतक-यांच्या मागणीवर सरकारनं आतापर्यंत कोणतही ठोस पाऊल उचललं नसल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचं रघूनाथदादा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शुक्रवारी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीनं बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेलं एकही आश्वासन अजून पाळलं नसून त्याबाबत कोणतंही ठोस पाऊल उचललं नसल्याचा आरोप या समितीनं केला आहे. त्यामुळे राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय सुकाणू समितीनं घेतला आहे. या आंदोलनादरम्यान शेतक-यांचा कुठलाच माल शहरात पोहचू देणार नसल्याचा इशारा सुकाणू समितीनं दिला आहे.

सरकारची 1.50 लाखांची कर्जमाफी फसवी आहे, तसेच सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राज्यातील शेतक-यांचा बोंडअळीचा प्रश्न, कापसाचा भाव, उसाचा भाव या सर्व प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला आहे. तसेच 17 जानेवारीला सुकाणू समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या सर्व मागण्यांबाबत चर्चा करणार असल्याचं रघूनाथदादा यांनी म्हटलं आहे. तसेच नंतर चर्चेनंतर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर संप अटळ असल्याचा इशारा सुकाणू समितीनं दिला आहे.

COMMENTS