अहमदाबाद – निवडणूक आयोगाने एका इलेक्ट्रॉनिक जाहिरातीत ‘पप्पू’ शब्दाचा वापर करण्यावर गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपवर बंदी घातली आहे. या जाहिरातीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रचाराच्या जाहिरातीतून ‘पप्पू’ शब्द वगळा असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
या जाहिरातीमधील कोणत्याही शब्दाचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही, असे भाजप सूत्रांनी सांगितले आहे. पण, जेव्हा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला जातो. तेव्हा सोशल मीडियावर ‘पप्पू’ या शब्दाचा वापर केला जातो. गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाने कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत.
गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी मतदान तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस दरम्यान आहे. भाजपने गुजरात निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या प्रचार साहित्यात कोणा एका व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आयोगाचा हा आदेश योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
COMMENTS