भाजप खासदार आणि अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनामुळे पंजाबमधील गुरूदासपुरमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. येत्या 11 ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होत आहे. तर मतमोजणी 15 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात मुख्य लढत ही भाजप-अकाली दल युती, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात होण्याची शक्यता आहे.
भाजपनं ही जागा राखण्यासाठी जोरदारपणे तयारी सुरू केली आहे. भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष विजय सांपला आणि पक्षाचे पंजाब प्रभारी प्रभात झा हे मतदारसंघात तळ ठोकून आहेत. ते या मतदारसंघात येणा-या 9 मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. तसंच बूथ लेव्हल कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करत आहेत. भाजपचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मात्र दिवंगत विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना यांचं नाव जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कामांचा पाढा भाजपकडून वाचला जाणार आहे. तसंच पंजाबमधील अमरिंदरसिंह सरकारच्या गैरकारभाराकडेही लक्ष दिले जाणार आहे.
काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन घमासान सुरू आहे. गेल्यावेळी लढलेले बावेजा यांच्याकडून त्यांच्या समर्थकाचं नावं पुढं केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र गुरूदासपूर लोकसभा अंतर्गत येणा-या सातही आमदारांनी एकमतानं प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचं नाव उमेदवारीसाठी सुचवलं आहे. त्यामुळे जाखड यांच्याचं नाव काँग्रेसकडून अंतिम होण्याची शक्यता आहे.
आम आदमी पार्टीनंही हळुहळु निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्ष पोटनिवडणुक लढवणार की नाही याबाबतच साशंकता होती. मात्र आता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीने निवडणूक इच्छुकांकडून अर्ज मागवायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत 7 जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सातही जण राजकारणाबाहेरचे आणि नवखे आहेत. उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं आम आदमी पार्टीतर्फे सांगण्यात आलंय. नवा कोरा चेहरा, स्वच्छ प्रतिमा आणि तरुण असा उमेदवार आम आदमी पार्टीतर्फे दिला जाईल असं पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखपाल खैरा यांनी सांगितलं आहे.
2014 मध्ये भाजपचे उमेदावर विनोद खन्ना यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह बावेजा यांचा 1 लाख 36 हजार मतांनी पराभव केला होता. तर आम आदमी पार्टीच्या उमेदवारानेही 1 लाक 73 हजार मते घेत तिसरा क्रमांक पटकावला होता. या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणा-या 9 विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हिंदू मतदार आहेत. तरीही काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत 9 पैकी केवळ 1 जागेवर भाजपला विजय मिळवता आला आहे. तर सात जागांवर काँग्रेसला यश मिळालं आहे. एक जागा शिरोमणी अकाली दलानं जिंकली आहे.
कविता खन्ना या सहानुभुती आणि मोदी सरकारची तीन वर्षातील कामगिरी याच्या जोरावर ही जागा टिकवतात की विधानसभेप्रमाणे काँग्रेस इथेही बाजी मारते की दोघांच्या वादात आम आदमी पार्टी काही आश्यर्याचा धक्का देते हे पाण्यासाठी 15 ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे.
COMMENTS