नाशिकमधील शिवसेना नेता भाजपच्या वाटेवर ?

नाशिकमधील शिवसेना नेता भाजपच्या वाटेवर ?

नाशिक: अवघ्या दोन वर्षात भाजपमधून राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले माजी आमदार बाळासाहेब सानप नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, सानप यांच्या प्रवेशाला भाजपमधील एका गटाने विरोध केला आहे.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदाच होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित केला जात आहे. सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपमधील ही लॉबी सक्रिय झाली असून त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आपला विरोध दर्शविण्याची तयारी सुरू केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. त्याशिवाय नाशिकमध्ये मनसेची मोठी व्होटबँक असल्याने भाजपसाठी ती सुद्धा एक मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळेच भाजपने सानप यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सानप यांचे कार्यक्षेत्र पंचवटी परिसर आहे. या परिसरातून पालिकेत २४ नगरसेवक निवडून जातात. सानप पक्षात आल्यास किमान 15 नगरसेवक सहज निवडून आणणे सोपे होईल, असा प्रत्येक पक्षाचा अंदाज आहे. दुसरीकडे सानप यांना पक्षात ठेवण्यासाठी शिवसेनेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

COMMENTS