विदर्भातील विरोधी पक्षाची पोकळी राष्ट्रवादी भरुन काढेल का ?

विदर्भातील विरोधी पक्षाची पोकळी राष्ट्रवादी भरुन काढेल का ?

विदर्भात तसं गेल्या काही वर्षातील राजकीय परिस्थितीवर नजर टाकल्यास काँग्रेस आणि भाजप याच दोन पक्षांना आलटून पालटून जनतेनं कौल दिलाय. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद विदर्भात तशी काही पॉकेट्समध्येच आहे. 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भानं ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तर काँग्रेस पुरती नेस्तनाबूत केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीतरं विदर्भातून हद्दपार झाल्यासारखी स्थिती आहे.

2014 च्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. मग ती नगरपालिकांची निवडणूक असो, महानगरपालिकांची असो किंवा जिल्हा परिषदांची निवडणूक असो. काँग्रेस पुरती खिळखिळा झाली आहे. त्यातच विदर्भातील काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी आहे. नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतिश चतुर्वेदी, चंद्रपूरमध्ये नरेश पुगलिया, विजय वडेट्टीवार, यवमाळमध्ये माणिकराव ठाकरे आणि विरोधक अशी प्रत्येक जिल्ह्यात गटबाजी उफाळली आहे. काँग्रेसला ही गटबाजी नवी नसली तरी भाजपची प्रचंड ताकद वाढल्यानंतर काँग्रेसमधील गटबाजी पक्षाला परवडणारी नाही. मात्र ती संपताना दिसत नाही. शिवसेनातर विदर्भात काही पॉकेट्समध्येच आहे. आणि पक्षाचं विदर्भात फार लक्षही नाही.

कर्जमाफीच्या मुद्यावरुन आणि शेतमालाच्या भावाच्या मुद्द्यावरुन विदर्भात सरकारविरोधात वातावरण तयार होत आहे. मात्र त्याचा फायदा घ्यावा असा विरोधक सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रादी काँग्रेसने विदर्भात लक्ष केंद्रीत करायचं ठरवलेलं दिसतंय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कधी नव्हे एवढ्या विदर्भाच्या प्रदीर्घ दौ-यावर होते. पूर्वी ते ज्या ठिकाणी पक्षाचे पॉकेट्स आहेत. त्याच ठिकाणी भेटी द्यायचे. मात्र या दौ-यात त्यांनी संपूर्ण विदर्भावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतंय. पवारांच्या दौ-याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी विदर्भातील चार जिल्ह्यांचा दौरा केला. आता पुढच्या टप्प्यात ते विदर्भात जात आहे. विदर्भात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून शेतकरी दिंडीही काढली जाणार आहे. सरकारविरोधातील पोकळीचा फायदा घेण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीला विदर्भात बस्तान बसवता आलं नाही. अगदी काही पॉकेट्समध्ये पक्ष राहिला आहे. विदर्भातील काँग्रेस असो किंवा भाजपच्या नेत्यांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळवते असा आरोप केला. त्यामुळे राष्ट्रवादी विदर्भात फारशी वाढू शकली नाही. त्यामुळे आता या राष्ट्रवादीच्या नव्या प्रयत्नांचे किती फळ पक्षाला मिळते हे पुढील काळात समजेल.

COMMENTS