पवार – ठाकरे एकत्र कसे आले ? सत्ता स्थापनेच्यावेळी  नक्की पडद्यामागे घडलं काय ? वाचा सविस्तर

पवार – ठाकरे एकत्र कसे आले ? सत्ता स्थापनेच्यावेळी  नक्की पडद्यामागे घडलं काय ? वाचा सविस्तर

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. काही तासातच ते सरकार कोसळलं. अजित पवार फडणवीस नेमके एकत्र कसे आले आणि पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी पुस्तक लिहिलं आहे. Checkmate  – How the BJP won and Lost Maharashtra असं या पुस्तकाचं नावं आहे. या पुस्तकामध्ये एका भागामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र कसे आले ? पडद्यामागे सूत्र कोणी हलवली ? भेटीगाठी कशा आणि कुठे झाल्या ? याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तो दिवस 21 ऑक्टोबरचा होता. विधानसभेचं मतदान सुरु होतं. त्याच वेळी शरद पवार यांना राजकीय हवेचा अंदाज आला होता. ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन यांच्यासह 19 पत्रकार शरद पवार यांना त्याच दिवशी भेटले होते. राज्यात ठाकरे सरकार येईल अशी हिंट पवारांनी त्याच दिवशी दिली होती. संजय मिस्किन सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेसला 62 जागा मिळतील. काँग्रेसला 50च्या आसपास जागा मिळतील. काँग्रेसची कामगिरी विदर्भात चांगली राहिल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली राहिल असं पवारांना वाटत होतं. या भागातून भाजपला फटका बसेल असा पवारांचा अंदाज होता.

निकाल लागले तेंव्हा भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकत नाही हे स्पष्ट झालं. निकालाच्या दिवशी शरद पवार यांनी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसले असं पत्रकारांना सांगितलं. त्याच दिवशी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार बाय रोड पुण्याला निघाले. पवारांची गाडी कळंबोलीमधील मॅकडॉनल्ड या हॉटेलजवळ आली. तिथे शिवसेना नेते संजय राऊत हे त्यांची वाट पाहत होते. राऊत त्यांच्या स्वतःच्या गाडीतून उतरले आणि शरद पवार यांच्या गाडीत बसले.

गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. संजय राऊत यांनी आपण भाजपला सत्तेपासून दूर ठेऊ. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री करु. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊ अशी योजना शरद पवारांना सांगितली. प्रवासादरम्यान राऊत आणि पवार यांच्यात जवळपास तासभर याविषयावर चर्चा झाली.

तीन पक्ष एकत्र येण्याच्या योजनेसाठी सोनिया गांधींचं मन वळवण्याची जबाबदारी शरद पवार यांनी घेतली. मात्र त्याच वेळी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनाही बोलण्याची सूचना केली. अशी माहिती खुद्द संजय राऊत यांनी पुस्तकाचे लेखक सुधीर सर्यवंशी यांना दिली. दोन्ही नेत्यांनी तळेगाव टोल नाक्यापर्य़ंत एकत्र प्रवास केला. संजय राऊत तळेगाव टोलनाक्यावर उतरले. त्यांच्या गाडीने ते पुन्हा मुंबईला परतले. निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. त्याच्याआधी राऊत यांनी पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला.

त्याच्या आधीही एक वेळ संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीतच तीन पक्ष एकत्र येण्याची हिंट मिळाली होती. राऊत पवार चर्चेदरम्यान राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला होता. दोघांमध्ये फोनवर 10 मिनिटे बोलणे झाले होते. संजय राऊत हे शिवसेनेचे अधिकृत भूमिका मांडत आहेत. ते जे बोलतील तीच शिवसेनेची भूमिका असेल असं उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना सांगितलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचा हवाला देऊन पवार-राऊत भेटीत नेमकं काय झालं याची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.  पवार राऊत यांच्या पहिल्या भेटीतच राऊत यांनी मातोश्रीचा निरोप शरद पवारांच्या कानावर घातला होता. त्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करु इच्छिते असं सांगण्यात आलं होतं. वहिणीसाहेब म्हणज्येच रश्मी ठाकरे या भाजपसोबत जाण्यास अजिबात तयार नाहीत. त्यांचा भाजपसोबत जाण्यास ठाम विरोध आहे असंही त्यांनी सांगितलं. बाळासाहेबांचं शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेनं वेगळी वाट चोखळायला हवी अशी भूमिका रश्मी ठाकरे यांनी मांडल्याचं राऊत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या संयमी स्वभावाचा भाजप गैरफायदा घेत असल्याचं ठाम मत रश्मी ठाकरे यांचं झालं होतं.

शरद पवार मात्र शिवसेनेवर त्यावेळी पूर्ण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज तुम्ही भाजपसोबत वाद घालत आहात. भांडत आहात. उद्या पुन्हा एकत्र याल अशी भीती पवार यांना होती. गेल्या पाच वर्षात भाजप शिवसेनेत टोकाचे वाद झाले. मात्र ते एकमेकांपासून दूर गेले नाहीत. त्यामुळे यावेळीही असंच होईल असं पवारांना वाटतं होतं. राऊत यांनी मात्र पवारांचा हा संशय दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना खरोखर पर्याय शोधत आहे असं त्यांनी पवारांना पटवून दिलं. शिवसेनेचं कडवं हिंदुत्व आणि मुस्लिमांबद्दल शिवसेनेची भूमिका यावरुन पवार तरीही शिवसेनेबाबत साशंक होते. मात्र संजय राऊत यांनी त्यांना याबाबतही शिवेसनेची भूमिका ही मराठी माणसाबद्दलची असल्याचंही सांगितलं. त्यानंतर सामनाच्या संपादकीयमधूनही महाराष्ट्र हीच शिवसेनेची प्रायारेटी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

11 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची वांद्र्याच्या ताज लँड हॉटेलमध्ये भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीकडून पवार यांच्यासह अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते. आणि याच बैठकीत तीनही पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याबाबत एकमत झालं. शरद पवार यांनाही तीन पक्षाच्या सरकारबाबत विश्वास निर्माण झाला होता. असं असलं तरी मुख्यमंत्रीपदाच्या नावावरुन शरद पवार हे समाधानी नव्हते. बैठकीनंतर शरद पवार लिफ्टमधून खाली येत असताना त्यांच्यासोबत संजय राऊत होते. त्यावेळी पवरांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत राऊत यांना विचारणा केली. त्यावर राऊत यांनी आदित्य ठाकरे याचं नावं सांगितलं. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाहीत असं त्यांना सांगितलं.  तरच सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे ही दोन्ही नावं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य नव्हती. उद्धव ठाकरे यांनीच या सरकारचं नेतृत्व करावं अशी भूमिका पवारांनी राऊत यांच्याकडे मांडली.

संजय राऊत यांनी वर जाऊन पवारांचा निरोप उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला. तिथेच आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या निरोपाने उद्धव ठाकरे काहीसे गोंधळून गेले. मी कधीही सरकारमध्ये काम केलेले नाही. मला याचा काहीच अनुभव नाही असं ते म्हणाले. पण संजय राऊत यांनी तुम्हीच सरकारचं नेतृत्व करावं असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्रीपद स्विकारायला तयार व्हायला पाहिजे. असं झालं नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार नाहीत असंही उद्धव यांना राऊत यांनी सांगितलं. आदित्य यांनीही बाबा तुम्हीच सरकारचं नेतृत्व करायला पाहिजे असं  सांगितलं. महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या हितासाठी तुम्ही सरकारचं नेतृत्व करायला पाहिजे असंही आदित्य म्हणाले.

COMMENTS