ओमराजेंवर हल्ला करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात !

ओमराजेंवर हल्ला करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात !

उस्मानाबाद – शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे. अजिंक्य टेकाळे असं या आरोपीचं नाव असून उस्मानाबाद पोलिसांनी त्याला शेतातून ताब्यात घेतलं आहे. मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास पोलिसांनी आरोपी अजिंक्यला शेतातून पकडलं आहे.हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा कळंब भाजपा आयटी सेलचा तालुका अध्यक्ष आहे. यापूर्वी त्याने ओमराजे यांच्याविरोधात फेसबूकची पोस्टही टाकली होती. यावेळी शिवसेनेला नव्हे तर राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचं त्याने म्हटलं होतं.

अजिंक्य टेकाळे

दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला केल्यानंतर आरोपी अजिंक्य हा कळंब तालुक्यातील पाडोळी या गावातील एका शेतात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी मध्यरात्री दरम्यान त्याला अटक केली असल्याची माहिती अधीक्षक राजतीलक रोशन यांनी दिली आहे.

उस्मानाबादमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. पडोळी (नायगाव) येथे काल सकाळी ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गावात रस्त्यावरून चालत जात असताना ही घटना घडली. टेकाळे या तरुणाने हातात हात देवून दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. पोटावर झालेला वार हातावर आणि मनगटावर, हातातील घड्याळवर बसल्याने खासदार निंबाळकर जखमी झाले आहेत. परंतु त्यांची प्रकृती सध्या सुखरूप असल्याची आहे.

ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांचीही 2006 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 13 वर्षांनी आता ओमराजे निंबाळकर यांच्यावरही खूनी हल्ला झाल्याने त्यांच्या जीवावर कोण उठलंय अशी चर्चा राज्यात सुरु आहे.

COMMENTS