शरद पवारांचा कोकण दौरा, राणेंची भेट आणि नातवंडांचे राजकीय ट्रेनिंग !

शरद पवारांचा कोकण दौरा, राणेंची भेट आणि नातवंडांचे राजकीय ट्रेनिंग !

रत्नागिरी – शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता कुठल्याही ठिकाणी आणि कितीही खाजगी दौ-यासाठी गेला तरी त्या ठिकाणी काही तरी राजकीय घडामोडी घडल्याशिवाय राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूरच्या खाजगी दौ-यावर होते. जवळच्या नात्यातले लग्न होते. तरीही त्या दौ-यात अनेक राजकीय घडामोडी घडल्याच. राजु शेट्टींनी पवारांची भेट घेतली. आणखीही काही राजकीय घडामोडी घडल्या. तसच शरद पवारांचा कोकण दौरा सुरू आहे. तोही खाजगी. मात्र यामध्येही ब-याच राजकीय घडामोडी घडत आहेत.

या दौ-यात शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमागे दोन गोष्टी असू शकतात. राणे यांचा पक्ष सध्या एनडीएसोबत असला तरी राणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी राणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अर्थात राणेंनी त्याचा इन्कार केला आहे. मात्र रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेची जागा राष्ट्रवादीनं स्वतःकडं मागितली आहे. आमच्याकडे तिथे स्ट्राँग उमेदवार असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. वास्तविक सध्या राष्ट्रवादीचं या मतदारसंघात फारसं  बळ नाही. त्यामुळे राणेंसाठीच राष्ट्रवादीनं ही जागा मागून घेतल्याची चर्चा आहे.

नारायण राणे किंवा त्यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे यांच्यासाठी लोकसभेची जागा मागून घ्यायची असा राष्ट्रवादीचा प्रय़त्न आहे. त्याचसोबत राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या दोन जागा द्यायच्या आणि तिसरी म्हणज्येच कणकवलीची जागा जागा राष्ट्रवादीला हवी आहे. तिथून सध्या शिवसेनेत असलेले बबन साळगावकर राष्ट्रवादीतर्फे विधानसभेची निवडणूक लढवू इच्छितात अशी चर्चा आहे. दुसरी गोष्टी राणे भाजपमध्ये आपली बोर्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी या भेटीचा राणेंना फायदा करुन घेतला आहे अशीही चर्चा आहे.

पवारांचे नातवंडांना राजकीय ट्रेनिंग ?

शरद पवारांच्या या दौ-यात पवार यांचे तीन नातू त्यांच्यासोबत आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले रोहित पवार, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि अजित पवारांच्या भावाचे पुत्र युगेंद्र श्रीनिवास पवार हे तीन जण त्यांच्या दौ-यात आहेत. हे तिघेही एकाच वेळी पवारांच्या दौ-यात असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. हे तिघे जण पवारांकडून राजकीय ट्रेनिंग घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यापैकी रोहित पवार हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आधीच त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला आहे. पार्थ पवार हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. अर्थात पवार यांनी याचा इन्कार केला आहे. मात्र भविष्यात ते निवडणूक लढवू शकतात.

COMMENTS