80 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, शरद पवार करणार कोकणचा दौरा!

80 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, शरद पवार करणार कोकणचा दौरा!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे 80 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात उतरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निसर्ग चक्रीवादळाने रायगड, कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काजू, फोफळी, आंबा, आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. दिनांक 9 जून रोजी रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

दरम्यान निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. त्यामुळे शरद पवार माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन या ठिकाणी भेट देऊन तेथील आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासोबत बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते दापोलीला भेट देणार असून तिथेच ते मुक्काम करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.

या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवार हे केवळ फोनवरुन चर्चा न करता स्वत: या जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेणार आहेत. हा दौरा आटोपताच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन कश्याप्रकारे मदत करता येईल यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS