पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे एका महिन्याचे वेतन देणार – शरद पवार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे एका महिन्याचे वेतन देणार – शरद पवार

पुणे – पूरग्रस्त भागातील शेतकय्रांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. कोल्हापूर, सांगली भागात पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पूर ओसरल्यानंतर या भागातील नुकसानीचे तातडीने मोजमाप आणि पंचनामे करण्याची मागणीही शरद पवार यांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागाला मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसला आहे. या पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.

तसेच राष्ट्रवादीच्यावतीनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नियोजन केले असून यामध्ये पक्षाच्या विधानसभा, विधानपरिषद आणि संसद सदस्यांच्या एका महिन्याचे वेतन देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या वेतनाचा ५० लाखांचा धनादेश सोमवारपर्यंत संबंधीत यंत्रणेपर्यंत पोहोचवला जाईल असेही पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सांगली, कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा भाग ऊस उत्पादनातील अग्रेसर भाग असून इथल्या पुरामुळे ऊसाच्या एकंदर उंचीपेक्षा अधिक भागापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. त्यामुळे ऊस पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर द्राक्षे आणि डाळींब सारख्या फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरे, रस्ते इतर पायाभूत सुविधा आणि जनावरेही वाहून गेली आहेत. पाणी ओसरल्यानंतरच नुकसानीचा खरा अंदाज येईल. यावेळी पुराची व्याप्ती आणि पूर भागातील शेतीचे झालेले नुकसान पाहता, पाणी ओसरल्यानंतर शासनाने तातडीने येथील नुकसानीचे मोजमाप आणि पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी पवारांनी केली आहे.

COMMENTS