उसना बाप नको, घरातला म्हातारा बापच हवा – पवार

उसना बाप नको, घरातला म्हातारा बापच हवा – पवार

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणववीस यांनी नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपला सत्ता द्या आपण नाशिकला दत्तक घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानुसार नाशिकरांनी भाजपच्या पारड्यात मतांचं भरभरुन दान दिलं. मात्र आता दत्तक बाप ढंकूनही बघायला तयार नाही, त्यामुळे आम्हाला उसना आणि दत्त बाप नको, तर आमच्या घरातल्या म्हातारा बापच हवा अशी नाशिकरांची भावना झाली आहे अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. तर छगन भुजबळच नाशिकच्या विकासासाठी योग्य आहेत असं सांगितलं. उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल मोर्चाची सांगता काल नाशिकमध्ये झाली. त्यावेळी झालेल्या सभेत पवारांनी टोलेबाजी केली.

देशात दरवर्षी 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात हे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. यावरून सरकारचा शेतक-यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो असंही पवार म्हणाले. धर्मा पाटील सारख्या बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस आल्याने सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. सामान्य माणसाप्रती सरकारची नियत चांगली नाही त्यामुळे आता बस झाले, आता या सरकारला बाजूला करण्यासाठी तयारीला लागले पाहिजे, तरुण, शेतकरी, कष्टकरी यांना चांगले जीवन जगायचे असेल तर सर्वांनी तयारीला लागले पाहिजे सत्ताधा-यांना खड्या सारखे बाजूला करा असं आवाहनंही त्यांनी नाशिकरांना केलं.

सरकार अडचणीत यायला लागले की या सरकारला शिवाजी महाराज यांचे नाव आठवते. शेतकरी कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराज यांचे नाव देऊन त्यांचा अपमान केला अशा शब्दात विधान परिषदेतली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या का होतयेत त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. तसंच जलयुक्त शिवार यशस्वी झाले तर राज्यातील रब्बीचे क्षेत्र कमी कसे झाले असा सवालही मुंडे यांनी केला. नाशिकचा सर्व विकास छगन भुजबळांनी केला, सीएम ने नाशिक दत्तक घेतले मात्र नाशिकचे प्रकल्प इतर मंत्री दुसऱ्या जिल्ह्यात पळवून नेतात असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. किसान सभेच्या मोर्चा ला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. धनंजय मुंडे किसान सभेच्या सभेला उपस्थित राहतील असंही सुळे यांनी सांगितलं.

COMMENTS