तेव्हा भाजप नेत्यांचे हसू येते, शरद पवारांचा पलटवार !

तेव्हा भाजप नेत्यांचे हसू येते, शरद पवारांचा पलटवार !

बीड, अंबाजोगाई – हैद्राबाद मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान देणार्‍या अंबाजोगाई आणि परळीतून सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला. भाजपचे नेत्यांना सर्वत्र शरद पवार दिसतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त माझ्यावर टीका करणारे भाजप नेते मी काय केलं असा प्रश्न मीच उभ्या केलेल्या स्टेडियममध्ये विचारतात तेव्हा त्यांचे हसू येते असा पलटवार त्यांनी अमित शहांवर अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत केला.

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणे असो किंवा महिलांना आरक्षण ते आम्हीच दिलं. याशिवाय विविध समाज घटकांना आम्हीच आरक्षण मिळवून दिलं याशिवाय औरंगाबाद इथल्या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर आम्हीच केलं. मात्र हे जनसामान्यांच्या मुळावर उठलेले सरकार केवळ आमच्यावर टीका करण्यात धन्यता मानतात असे सांगुन आपल्या भाषणात शरद पवारांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आदींचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर घणाघाती हल्ले चढवले.

आता वेळ आली आहे इथल्या भूमिपुत्रांना इथेच रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार्‍या धनंजय मुंडेंचे हात बळकट करण्याची. त्यामुळे परळी, अंबाजोगाई औद्योगिक केंद्र करण्यासाठी संपूर्ण ताकद धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभी करू असा विश्वास शरद पवारांनी जनतेला दिला. परळीतून धनंजय मुंडे तर केज-अंबाजोगाई येथून पृथ्वीराज साठेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन शरद पवारांनी जनतेला केले आहे.

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- धनंजय मुंडे

रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. परळी आणि केज-अंबाजोगाई मतदारसंघातील सर्व समाज घटकांचे उत्पन्न दुपट्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास यावेळी धनंजय मुंडेंनी व्यक्त केला. सोबतच राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करून गद्दारी करणार्‍या अक्षय मुंदडा यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. साहेबांची साथ मी शेवटपर्यंत सोडणार नाही असे जाहीर सभेत बोललेल्या अक्षय मुंदडा यांची क्लिप ऐकवत जे आईच्या वचनाला जागले नाहीत ते कोणाचेच होत नाहीत असा प्रखर हल्लाबोल धनंजय मुंडेंनी केला. तसेच आम्ही जनतेच्या विश्वासाला सुईच्या टोकाएवढा तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन धनंजय मुंडेंनी केले.

मी प्रामाणिक सेवा करणारा- पृथ्वीराज साठे

केजचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी मी पक्षाचा जसा प्रामाणिक आहे तसाच अंबाजोगाईच्या जनतेची प्रमाणिक सेवा करणारा सेवक आहे, असे म्हणत त्यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना नमन करून आपल्यातील विनम्रता दाखवून दिली. यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, दत्ताआबा पाटील, मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष मिलिंद आव्हाड, जि.प.सदस्य संजय दौंड, कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष बब्रुवान पोटभरे, नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, भाई मोहन गुंड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पवार, केजचे नगराध्यक्ष आदित्य दादा पाटील, बबनदादा लोमटे, विलासराव सोनवणे, हाफीज सिद्दीकी, अ‍ॅड.अनंत जगतकर, मनसेचे सुनिल जगताप, नगरसेवक वासंती बापजी, उत्तमराव गंगणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संचलन डॉ.नरेंद्र काळे यांनी केले. या सभेस तुफान गर्दी झाली होती.

COMMENTS