शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार?

शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार?

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. या फोडाफोडीमुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर आहेत. या फोडाफोडीदरम्यानच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर दिसणार आहेत. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

7 माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार

महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंत्री म्हणून 19 वर्षे प्रभावीपणे काम केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधिमंडळातील कामकाजावरती अभ्यासूपणे लिहिलेल्या ” विधानगाथा ” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवार (दि.30) रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सदर कार्यक्रम हा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या पुस्तक प्रकाशन समारंभास सध्या राज्यात असलेले सर्व 7 माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री व सर्व 7 माजी मुख्यमंञी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्यामुळे पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात एकाच मंचावर येणारे हे दोन दिग्गज नेते एकमेकांवर टीका करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS