माळशिरसचा राहुल सुळ ठरला यंदाचा परळी केसरी, रोमहर्षक कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला केले चितपट !

माळशिरसचा राहुल सुळ ठरला यंदाचा परळी केसरी, रोमहर्षक कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला केले चितपट !

परळी – रात्रीच्या दीड वाजेपर्यंत अंतिम क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला चितपट करत माळशिरसचा पहिलवान राहुल सुळ यंदाचा परळी केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. एक किलो चांदीची गदा, रोख ५१,००० रुपये व मानाचा फेटा बांधून राहुलचा गौरव करण्यात आला.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही परळी केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दुपारी दोन वाजल्यापासून रात्री तब्बल दिड वाजेपर्यंत विजेत्या पहिलवानास शंभर रुपयांपासून 40 हजार रुपये बक्षीस पर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. या कुस्त्यांमध्ये बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून कुस्तीपटू मल्लांनी प्रचंड मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आलेल्या प्रत्येक पहिलवानास आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली पाहिजे अशी सूचना धनंजय मुंडे यांनी केली होती, त्यामुळे तब्बल अकरा तास कुस्ती शौकिनांना जंगी कुस्त्या पाहायला मिळाल्या.

शेवटची कुस्ती हे विजेत्या पहिलवानास चांदीची गदा व 51 हजार रुपयांच्या नगदी बक्षीसासह सह परळी केसरी बहुमान मिळवून देणारी होती त्यासाठी तब्बल 6 पैलवान शड्डू ठोकून तयार होते, म्हणून पंचांनी साखळी पद्धतीने ऑलिंपिक कुस्ती च्या धर्तीवर तीन कुस्त्या खेळवत अंतिम सामन्यासाठी पुण्याचा संतोष गायकवाड व माळशिरस चा राहुल सुळ यांच्यात परळी केसरी किताबासाठी अंतिम कुस्ती लावली. नऊ मिनिटे चाललेल्या या रोमहर्षक कुस्ती मध्ये राहुलने शेवटच्या मिनिटात संतोष गायकवाडला धूळ चारत आस्मान दाखवले व परळी केसरी या किताबावर आपले नाव कोरले.

विशेष म्हणजे प्रत्येक कुस्तीमध्ये पराभूत झालेल्या पहिलवानास सुद्धा उत्तेजनार्थ ठराविक रक्कम देऊन त्यांचाही उचित सन्मान करण्यात आला, हे या कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल!

अंतिम कुस्ती नंतर परळी केसरी विजेता राहुल सुळ याला मानाचा फेटा बांधून चांदीची गदा, 51 हजार रुपये रोख असे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार संजय दौंड यांच्यासह नगरपरिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड, नगर परिषदेचे सभापती श्रीकृष्ण कराड, माऊली तात्या गडदे, अभय मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, अयुब खान पठाण, किशोर पारधे, यांसह नगर परिषद सदस्य, मान्यवर नेते, पदाधिकारी व असंख्य कुस्तीप्रेमी रात्रीच्या दीड वाजेपर्यंत उपस्थित होते. कुस्ती स्पर्धेत प्रत्येकाला योग्य न्याय मिळावा यासाठी पंच म्हणून शिवशंकर मुंडे, सूर्यकांत मुंडे, माऊली तात्या गडदे, सोपान चाटे, अजय जोशी, विश्वनाथ देवकते, गणपत उर्फ बिट्टू मुंडे, महादेव दहिफळे, श्रीहरी गित्ते, सुभाष नानेकर, अतुल दुबे, कुस्ती समालोचक प्राध्यापक धोत्रे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

COMMENTS