पोपटराव पवारांवर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्यांचा हा निकाल

पोपटराव पवारांवर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्यांचा हा निकाल

अहमदनगर: ‘आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवारांच्यावर एकाधिकार शाहीचा आरोप करण्यात आला. यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ग्रामपंचायत निवडणुक पोपटराव पवार यांच्या पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला. सर्वांचे डिपाॅझिट जप्त झाले.

हिवरेबाझारमध्ये ९० च्या दशकात पवार यांच्या पुढाकारातून ग्रामपरिवर्तनाची सुरवात झाली. विविध उपक्रम राबवत गावाने आदर्शगाव आणि विकासाकडे झेप घेतली. निवडणुकीच्या राजकारणामुळे एकोपा राहत नाही, त्यामुळे ग्रामसभेत निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध केली जात होती. गावाने राजकीय पक्षांनाही थारा दिलेला नाही. आतापर्यंत ही पद्धत चालत आली. यावेळी मात्र, पवार यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करून गावातील काही विरोधकांनी बंड पुकारले. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची पंरपरा मोडली गेली. मात्र, तरीही सयंमाने प्रचार करण्याचे ठरवून गावाने शांतता भंग होऊ दिला नाही. अखेर विरोधकांची डाळ शिजली नाही.

हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्व विजयी झाले. किशोर संबळे यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडाला. विरोधी उमेदवारांना अतिशय कमी मते मिळाली असून त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

निकालानंतर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, ‘हिवरे बाजारकडे आम्ही केवळ एक गाव म्हणून पहात नाही. अन्य गावांना दिशा देणारे ते केंद्र आहे. त्यामुळे येथे निवडणूक घेण्याची वेळ आली तरीही आम्ही ती आदर्श पध्दतीनेच करून दाखविली. ग्रामस्थांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. ज्या हातांनी गाव उभे केले, तेच हात याही पुढे गाव चालविण्यास सक्षम आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

COMMENTS