परळीत राष्ट्रवादीला धक्का, धनंजय मुंडेंच्या कडव्या समर्थकानं दिला राजीनामा!

परळीत राष्ट्रवादीला धक्का, धनंजय मुंडेंच्या कडव्या समर्थकानं दिला राजीनामा!

बीड – परळीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक दीपक देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शहरातील पाणीप्रशन सोडवण्यास अपयशी ठरल्यामुळे आणि पक्षानं योग्य ते सहकार्य न केल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं दीपक देशमुख यांनी म्हटलं आहे. दीपक देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान दीपक देशमुख यांचा परळी शहरात मोठा जनसंपर्क आहे. तसेच धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे. शहरात आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु पक्षाकडून आणि धनंजय मुंडे यांच्याकडून आपल्याला योग्य ती मदत मिळाली नसल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात जनतेच्या भल्यासाठी आपण लढा देणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS